कोल्हापूर (वृत्तसंस्था) शिकवणी संपल्यानंतर घरी जाणाऱ्या एका मुलावर जरगनगर येथील लक्ष्मीबाई जरग शाळेजवळ भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात विहान विजय शिंदे ( वय ९, रा. जरगनगर, कोल्हापूर) हा गंभीर जखमी झाला. कुत्र्यांनी त्याच्या शरीरावर सहा ठिकाणी लचके तोडले. हा प्रकार रविवारी (दि. २२) दुपारी एकच्या सुमारास घडला.
विहान हा रविवारी दुपारी लक्ष्मीबाई जरग शाळेजवळ क्लासला गेला होता. क्लास सुटल्यानंतर तो शाळेजवळ असलेल्या वडिलांच्या दुकानाकडे निघाला होता. यावेळी चार-पाच भटक्या कुत्र्यांनी त्याला घेरले. अचानक त्याच्यावर हल्ला केला. हा प्रकार लक्षात येताच बांधकामावरील कामगारांनी कुत्र्यांना पिटाळून लावले.
कुत्र्यांच्या हल्ल्यात चेहरा, गळा, पोट, मांडी आणि पायाला जखमा झाल्याने विहान रक्तबंबाळ झाला. आरडाओरडा ऐकून विहानच्या वडिलांनीही धाव घेतली. क्रिडाईचे माजी अध्यक्ष महेश यादव यांचा मुलगा मयूरेश याच्या कारमधून जखमी विहानला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे रेबिजचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.