धरणगाव (प्रतिनिधी) – शहरालगत असलेल्या चिंतामणी मोरया परिसरात गेल्या वीस दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद आहेत. पावसाळ्याचे दिवस सुरू असून संध्याकाळी आणि रात्री संपूर्ण परिसर अंधारात बुडालेला असतो. या अंधारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून चोरीच्या घटना वाढत आहेत. विशेष म्हणजे, स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात नगरपालिका व महावितरण विभागाकडे तक्रारी केल्या असतानाही याकडे कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही.
परिसरात वीज नसल्यामुळे अंधार पसरलेला असून, काही समाजकंटकांना याचा गैरफायदा घेता येतो. त्यामुळे नागरिकांना संध्याकाळनंतर घराबाहेर पडण्यासही भीती वाटते. याबाबत नागरिकांनी सातत्याने तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त भावना उफाळून आल्या आहेत.
नागरिकांचा सवाल – “२५-३० वर्षे लाईट सुरू होती, आता अचानक बंद का?”
चिंतामणी मोरया परिसरातील रहिवाशांचा स्पष्ट आरोप आहे की, गेली २५ ते ३० वर्षे या भागात स्ट्रीट लाईट सुरू होते. मग अलीकडेच का अचानक लाईट बंद करण्यात आले? नगरपालिका प्रशासनाने याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रशासनाची भूमिका
राजेंद्र पाटील, विद्युत वितरण विभाग, धरणगाव :
“चिंतामणी मोरया परिसरातील लाईटबाबत काही बिघाड असेल तर आमच्याकडे कळवावे. आम्ही दुरुस्ती करतो. मात्र, लाईट सुरु ठेवणे हे आमच्या अखत्यारीत नाही. त्या संदर्भात संबंधित प्राधिकरणाशी संपर्क साधावा.”
राहुल तळेले, विद्युत अभियंता, नगरपालिका विभाग :
“नगरपालिकेची हद्द जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आम्ही लाईट सुरू ठेवतो. चिंतामणी मोरया हा भाग ग्रामीण हद्दीत येतो. त्यामुळे तेथील लाईटचा प्रश्न आमच्या कार्यक्षेत्राबाहेरचा आहे.
गेल्या अनेक वर्षानुवर्षे स्टेट लाईट सुरू होते. परंतु आत्ताच का नगरपालिका प्रशासनाला जाग आली?. नगरपालिका प्रशासन नागरिकांना त्रास देण्याचे काम करत आहे. नगरपालिकेच्या इमारतीला लागून असलेले सट्टापेढी ती देखील अतिक्रमणमध्ये आहे. तिथे नगरपालिका प्रशासन लक्ष देईल का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे..?
ललित मराठे
चिंतामणी मोरया नगर रहिवासी