धरणगाव (प्रतिनिधी) आगामी दुर्गा उत्सव ,वहन उत्सव,रथोत्सव काळात तालुक्यात आणि शहरात जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्था अबाधित राहवी, यासाठी सर्वांनी एकोप्याने राहून उत्सव पार पाडावे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. मात्र, जातीय तणाव निर्माण होईल असे कृत्य केल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा पो. नि. राहुल खताळ यांनी दिला आहे. आगामी दुर्गा उत्सव ,वहन ,रथ ,उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्या मार्फत श्री मंगल कार्यालय आणि लॉंन्समध्ये आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना पो.नि. खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार उत्सव साजरा करावा. तसेच शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियाचा वापर, कोणतीही पोस्ट करताना खात्रीने करावी. कोणतेही प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. शांतता भंग होईल असं कोणत्या प्रकारचे कृत्य करू नये. कोणाला करू देऊ नये आणि तसे आढळल्यास तातडीने पोलीस प्रशासनाला कळवावे, असे आव्हान देखील त्यांनी केले.
धरणगाव शहराची परंपरा उज्वल आहे जातिय सलोखा आणि शांततेच्या बाबतीत सातत्याने नागरिक, पोलीस एकमेकांना सहकार्य करीत असतात. हीच भावना कायमस्वरूपी राहावी, असे श्री खताळ म्हणाले. पोलिस आणि नागरिकांचे सण उत्सवाच्या काळात आणि एरव्ही देखील एकमेका सहाय्य करू आणि शांतता राखु, अशा पद्धतीने वावरले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्ती केली. प्रा डी.आर. पाटील यांनी वहन आणि रथ उत्सव बाबत माहिती देवून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा आदर करावा, गावा पेक्षा कोणीही मोठा नाही, उत्सवाला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे असे सांगत उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, सुरेश चौधरी, भानुदास विसावे, गुलाबराव वाघ ,सुनील चौधरी, भगीरथ माळी आदींनी मनोगत व्यक्त केले.
या बैठकीला नायब तहसीलदार श्री.भट,सहायक पोलिस सब इन्स्पेक्टर संतोष पवार, अमोल गुंजाळ, सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ ,बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा.डी.आर. पाटील, कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी, नगरपालिकेचे संजय मीसर,विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी,बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचे पदाधिकारी, तालुक्यातील पोलीस पाटील,सरपंच,ग्राम सुरक्षा दलाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.