जळगाव (प्रतिनिधी) आईला भेटण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी १ लाख ३५ हजार रुपयांचा सोने चांदीचे दागिने चोरुन नेले असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गुजराल पेट्रोलपंपा शेजारील निवृत्ती नगरातील संकल्पसिद्धी अर्पाटमेंटमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल लक्ष्मण सपकाळे (वय ६०) हे कुटुंबियांसह वास्तवयास आहेत. त्यांचा मुलगा हा म्युझिक कंपोझर असल्याने तो मुंबईत राहत असून त्यांचे मोठे भाऊ रमेश सपकाळे हे पिंप्राळा परिसरात राहतात. मंगळवार दि. १८ रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास अनिल सपकाळे हे पत्नी व सूनेला घेवून त्यांच्या आईला भेटण्यासाठी मोठ्या भावाकडे गेले होते. आईची भेट झाल्यानंतर ते पावणेचार वाजेच्या सुमारास पुन्हा घरी परतले. त्यावेळी त्यांना घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप तुटलेले होते तर घराचा दरवाजा देखील उघडा होता.
घराचा दरवाजा उघडा असल्याने सपकाळे कुटुंबिय घरात गेले असता, त्यांना बेडरुममधील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. तसेच कपाट आणि त्यातील लॉकर उघडे असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे सपकाळे यांच्या सूनेने लॉक व्यस्थित बघितले असता, त्यांना त्यामध्ये ठेवलेले दागिने दिसून आले नाहीत. सपकाळे यांच्या घरातून चोरट्यांनी ३ तोळे सोन्याची मंगलपोत, ४ ग्रॅमचे कानातील झुंबर, ८ ग्रॅमच्या दोन अंगठ्या, १ ग्रॅम वजनाच्या पाच अंगठ्या व १५ भार वजनाचे चांदीच्या पाटल्या, वाळे असा एकूण १ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला, भरदिवसा अपार्टमेंटमध्ये घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे..
डायल ११२वर दिली घटनेची माहिती
घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच सपकाळे यांनी डायल ११२ वर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौकशी केल्यानंतर रात्री अनिल सपकाळे यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.