पुणे (वृत्तसंस्था) कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनानं कठोर पावलं उचलत मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात रात्री अकरा ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आले. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरात सोमवारपासून रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ११नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसंच, शाळा आणि महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहे. तसंच, खासगी कोचिंग क्लासला दिलेली परवानगी रद्द केली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी असलेल्या अभ्यासिका या ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार. पुणे विभागातील कोरोना हॉटस्पॉट निश्चित करुन तेथे सर्वेक्षण वाढवण्यात येणार आहे. दुसरीकडे कोरोनाविरोधात लढण्याचं बळ मिळण्यासाठी लसीकरणाचा वेगही वाढविणार आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता येथे काही कठोर निर्णय घेण्यात आले आहे. पुण्यात उद्यापासून रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवांना निर्बंधातून वगळण्यात आले आहेत.