सांगली (वृत्तसंस्था) एका शाळकरी मुलीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी रात्री आठ वाजता हा प्रकार घडला. श्रेया श्रीशैल न्हावी (वय १५,रा. न्हावी वस्ती,ता. जत) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.
श्रेया ही संख येथील आर. बी. पी. हायस्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती. काल रात्री ती नेहमीप्रमाणे लवकरच झोपी गेली. गावात वीजपुरवठा खंडित झालेला होता. रात्री आठच्या सुमारास तिला सर्पदंश झाला. ती जागी होऊन ओरडू लागली. कुटुंबीयांनी पाहिल्यानंतर सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आणले.
खासगी रुग्णालयात तत्काळ नेले. तेथन तिला रात्री दहाच्या समारास जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. न्हावी वस्तीवर आक्रोश करण्यात आला. तिच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात शवाविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.