जळगाव (प्रतिनिधी) इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील आश्रमशाळेतील विद्यार्थी प्रथमच विधानभवनाला भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत. या अभ्यास भेटीत विद्यार्थ्यांना विधानभवनाच्या कामकाजाचा थेट अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
नाशिक विभागातील तांडा, वाडी-वस्त्यांवरील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विधानभवनाच्या कामकाजाचा थेट अनुभव घेण्याची संधी मिळावी यासाठी ही अभ्यास भेट आहे. यासाठी जळगाव विभागाचे 14 विद्यार्थी व 1 शिक्षिका आणि 1 शिक्षक आणि 41 विद्यार्थी यी अभ्यास भेटीसाठी रवाना झाले आहेत. यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विधानसभेचे कामकाज पाहता येणार आहे. आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे जाऊन राष्ट्राची प्रगती साधावी, हा शासनाचा यामागील उद्देश आहे.
या अभ्यास भेट दरम्यान विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला, तारांगण या ठिकाणांना देखील विद्यार्थी भेट देतील असा मानस आहे. शासनाच्या विविध उपक्रमांद्वारे विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दार खुले करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे. या अभ्यास भेटीसाठी सचिव विनोद सिंघल ,संचालक ज्ञानेश्वर खिल्लारी, नाशिक इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसंचालक भगवान वीर, सहायक संचालक योगेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.