जळगाव (प्रतिनिधी) : सातत्याने विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यारे विवेकानंद प्रतिष्ठान संचालित शानबाग विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल व पंढरपूर वारीचे महत्व पटवून देणारी गाईड या एकांकिकेचा प्रयोग करण्यात आला. नाट्यरंग जळगाव निर्मित या एकांकिकेच्या सादरीकरणाने विद्यार्थी – विद्यार्थिंनींनी पंढरपूर वारीचे अध्यात्मिक व सांस्कृतिक महत्वाचा भावस्पर्शी अनुभव घेतला.
गाईड या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन अमोल संगीता अरुण यांनी केले असून, कलावंत सुहास दुसाने व अथर्व रंधे यांनी उपस्थित बालप्रेक्षकांना या सादरीकरणाचा आनंद दिला. एकांकिकेचे पार्श्वसंगीत पियुष भुक्तार तर रंगभूषा व वेशभूषा दिशा ठाकूर यांनी केली होती. सुयोग राऊत आणि दर्शन गुजराथी यांनी रंगमंच व्यवस्था केली होती.
नाट्याच्या माध्यमातून अध्यात्म आणि श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव बालप्रेक्षकांना अनुभवता आला. एकांकिका सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून एकांकिकेतील आशय, भक्तीभाव आणि सादरीकरणाच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले. शालेय पातळीवर अशा प्रकारच्या कलाकृती विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीवर सकारात्मक प्रभाव टाकते, याची प्रचीती यावेळी आली.