जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अहुजा नगर परिसरात एका 22 वर्षीय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज रात्री उघडकीस आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की अहुजा नगर परिसरातील वृंदावन सोसायटी जवळ एका घरात महेंद्र देवीदास पाटील (वय 22) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. महेंद्र हा मागील तीन महिन्यापूर्वीच जळगावात रहावयास आला होता. दोन दिवसापूर्वी त्याची बहीण आणि मेहुणे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आज सकाळपासून त्याच्याशी संपर्क होत नसल्यामुळे त्यांनी शेजारच्यांना फोन केला. दरवाजा ठोठावून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर शेजारच्यांनी पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी शेवटच्या बेडरूममधील खिडकीचे लॉक तोडले असतात महेंद्र हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, मृतदेहाच्या खिशात वा खोलीत कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट आढळून आली नसल्याचे कळते. जळगाव तालुका पोलिस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेला आहे. नातेवाईकांनी मृतदेह पाहून एकच आक्रोश केला. तर परिसरात या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. दुसरीकडे महेंद्रने आत्महत्या का केली?, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तर महेंद्रने साधारण अठरा ते वीस तासापूर्वी गळफास घेतल्याचा अंदाज पोलिस सूत्रांनी वर्तविला आहे. दरम्यान, महेंद्र हा जळगाव शहरातील एका स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसमध्ये तयारी करत असल्याचे कळते.
















