मुंबई : पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. तसेच वारकऱ्यांना अपघात गटविमा आणि त्यांच्या वाहनांना मागील वर्षाप्रमाणे यंदाही टोल माफी देण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी जाहीर केले.
पंढरपूर तीर्थक्षेत्र आषाढी एकादशी वारी पालखी सोहळा पूर्व नियोजनासाठी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अथितीगृह येथे विशेष बैठक पार पडली. यंदाची आषाढी वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी, यासाठी शासन सर्वतोपरी नियोजन करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आषाढी वारीसाठी गतवर्षी पंढरपुरात भेट देऊन, पाहणी करून तयारी केली होती.
यंदाही चांगले नियोजन करून आषाढ वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी, यासाठी शासनाच्या सर्वच विभागांनी चांगली तयारी केली आहे. विशेषतः अपघात टाळण्यासाठी गृह विभागाला नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. शेतकऱ्यांचे, वारकऱ्यांचे आहे. सरकारने कमी वेळात शेतकरी, माता-भगिनी आणि तरुणांसाठी जास्तीत जास्त निर्णय घेतले आहेत.
आषाढी वारीतील वारकऱ्याचा दुर्दैवाने अपघात झाल्यास गटविमा मिळावा, म्हणून गतवर्षीपासून विमा योजना लागू केली आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी एसओपी निश्चित केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, वारकरी प्रतिनिधींनी मागणी केल्यानुसार दौंड येथील भीमा नदी काठी होणारा कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. या निर्णयाचे बैठकीतच समस्त वारकरी संप्रदायाने टाळ्यांनी आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केले.