बोदवड (प्रतिनिधी) मुक्ताईनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली जाहीर सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी पूर्णत्वास आली असून स्वतः आमदार चंद्रकांत पाटील हे जातीने नियोजनाकडे लक्ष ठेऊन आहेत.
मुक्ताईनगर मतदारसंघात मुख्यमंत्री या सभेत काय बोलतात?, याची उत्सुकता सर्वांना लागून आहे .बोदवड तालुक्यातील आमदार चंद्रकांत पाटील यांचे समर्थकांनी सुद्धा सभेस जाण्यासाठी जय्यत तयारी केली असून बोदवड तालुक्यातून पाच हजारावर कार्यकर्ते जाण्याचे नियोजन केले आहे. एकूणच ही सभा मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेना-शिंदे गटात उत्साह निर्माण करणारी व राजकीय वातावरण गरम करणारी ठरणार आहे.
मंगळवारी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री शिंदे यांचे जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. तेथून ते वाहनाने पाळधी, ता. धरणगाव येथे जाणार असून दुपारी ४ वाजता शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे अनावरण होणार आहे. त्यांनतर वाहनाने ते मुक्ताईनगरकडे जाणार आहेत. संध्याकाळी ५.३० वाजता मुक्ताईनगरात मुख्यमंंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर ते जळगाव विमानतळावर येऊन तेथून मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
















