नागपूर (वृत्तसंस्था) आपल्या प्रेमाला कुटुंबिय स्वीकार करणार नाही या भितीने घरातून पळ काढला. मात्र, कुटुंबीयांना दिसताच बेला येथील एका प्रेमी युगुलाने विहरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघांचीही आपसात चांगली ओळखी असून, ते शुक्रवार (दि. २५) पासून बेपत्ता होते. महेश शालिक ठाकरे (वय २६) व तन्वी विठ्ठल चुटे (१६, दोघेही रा. बेला, ता. उमरेड) अशी मृतांची नावे आहेत.
महेश गुराखी होता, तर तन्वी बेला येथील तिडके हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकायची. दोघेही दोन वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते. ते शुक्रवारी कुणालाही न सांगता घरून निघून गेले होते. ही बाब लक्षात येताच दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. महेशच्या कुटुंबीयांनी सोमवारी त्याचा शोध बेलापासून तीन कि.मी. वर असलेल्या कुर्ला (ता. समुद्रपूर) शिवारात घेतला. दोघेही त्यांना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रोडने जात असल्याचे दिसले. कुटुंबीयांना पाहताच दोघांनी धावत जाऊन कुर्ला शिवारातील अक्षय जनार्दन कांबळे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेतली. त्यामुळे महेशच्या कुटुंबीयांनी तन्वीच्या कुटुंबीयांना व बेला पोलिसांना माहिती दिली. समुद्रपूर पोलिसांनी सायंकाळी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.
अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद
दोघांचेही शोधकार्य सुरू असताना तन्वी महेशसोबत निघून गेल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी महेशच्या विरोधात त्याने तन्वीचे अपहरण केल्याची तक्रार नोंदविली होती. त्या तक्रारीच्या आधारे बेला पोलिसांनी महेश ठाकरे यांच्या विरोधात भादंवि ३६३ अन्वये गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती.