जळगाव (प्रतिनिधी) शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी प्राप्त झाला असून त्यातून लवकर लवकर विकासकामे सुरू करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने दोन दिवसात आपल्या प्रभागातील कामे सुचवावी. तसेच मनपा अधिकाऱ्यांकडून कामाचे मोजमाप करून इस्टीमेट तयार करून घ्यावे असे महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सांगितले.
१० कोटींच्या निधीतून विकासकामे करण्यासंदर्भात शनिवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सर्व नगरसेवक आणि मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापौरांनी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामासंदर्भात काही अटी व नियम निश्चित केल्या. प्रत्येक प्रभागासाठी ४० लाखांचा निधी देण्यात आला असून शक्यतो प्रभागातील चारही नगरसेवकांनी एकत्रित येऊन एकच काम सुचवावे किंवा इतर महत्त्वाची वेगवेगळी कामे सुचवावी असे महापौरांनी सांगितले. आपल्या प्रभागातील कामे सुचविताना शक्यतो रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे सुचवावी असे महापौरांनी सांगितले. सर्व नगरसेवकांनी मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्या कामाचे इस्टीमेट दोन दिवसात सादर करावे, अशा सूचना महापौरांनी केल्या. १० कोटींच्या निधीतील कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस असल्याचे महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सांगितले.
कामासंदर्भात ठरल्या नियम, अटी
१० कोटीतून केल्या जाणाऱ्या कामासंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या निविदामध्ये काही अटी-शर्ती नमूद करण्यात येणार आहे. मनपात घेतलेल्या बैठकीत महापौर सौ.भारती सोनवणे यांच्यासह सर्व सदस्यांशी चर्चा करून त्या अटी निश्चित करण्यात आल्या. त्यात, कार्यादेश निर्गमित केल्यानंतर ३ दिवसात काम सुरू करणे बंधनकारक राहील, कार्यदेशाची रक्कम व काम पूर्ण करण्याची मुदत यानुसार दंडाची रक्कम निश्चित करण्यात येईल, मागील काळात शासकीय निधीतील कामे प्रलंबित असलेल्या मक्तेदाराचा विचार केला जाणार नाही, मुदतीत काम पूर्ण करणेकामी कामाचे नियोजनबाबत बारचार्ट देणे बंधनकारक राहील, कार्यादेशानंतर कमीत कमी ५० टक्के काम पूर्ण झाल्यानंतरच धावते देयक सादर करता येईल, कोणत्याही सबळ कारणाशिवाय मुदतवाढ मिळणार नाही या अटींचा समावेश आहे.