बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील शेलवड गावी एका अल्पभूधारक शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची दु:खद घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, शेलवड येथील संजय सीताराम सोनवणे (सातपुते) वय ४७ यांनी दुपारी सुमारे एक वाजून पंधरा वाजता स्वतःच्या कपाशीचे व मका पीक लावलेल्या शेतातील कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत शेतकऱ्याकडे साडेतीन एकर शेती असून या वर्षी शेतीसाठी महाराष्ट्र बैंकेचे सुमारे एक लाख रुपये कर्ज घेतले होते. शेतातील दोन एकर मका वारा आणि पावसामुळे पडल्याने नुकसान झाले होते. तसेच नुकत्याच आलेल्या पावसामुळे वेचणीस आलेला कापूस भिजला व कपाशीवर आलेला रोग यामुळे हा शेतकरी चिंतेत होता, असे त्यांच्या मुलाने सांगितले. मयताचे पश्चात आई पत्नी एक विवाहित मुलगी व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेबाबत शुभम अहिर यांच्या खबरीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद घेण्यात आली असून या घटनेबाबत तालुका न्यायदंडाधिकारी खबर प्रत पाठवण्यात आली आहे. पुढील तपास हे पोहेकॉ विलास महाजन हे करीत आहेत.
















