सातारा (वृत्तसंस्था) सातारा जिल्ह्यात काल एकाच दिवशी दोन विद्यार्थीनींनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यातील एका विद्यार्थिनीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ही पालकवर्ग, शिक्षक आणि एकूणच विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांची बळजबरी करणाऱ्यांचे डोळे उघडणारी आहे. सेमी इंग्लिश नको असल्यामुळे जीवन संपवत असल्याचे या सुसाईड नोटमध्ये तिने म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शाहुपुरी येथे नववी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन जीवन संपवले. ‘सेमी इंग्लिश मीडियम नको’ म्हणून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. शाहुपुरी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या मुलीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नका, असा उल्लेख करण्यात आला आहे. ‘सेमी इंग्लिश मीडियम नको’ असल्याने मी आत्महत्या करत आहे, असे तिने या चिठ्ठीत लिहून ठेवले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला असून, शाहुपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने सातारा शहर परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगी घरी एकटीच होती. त्यावेळी तिने पंख्याला गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसर हादरला आहे.
मलकापूरमध्येही मुलीची आत्महत्या
साताऱ्यातील शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, कराड येथील मलकापूरमध्येही एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही मुलगी नववी इयत्तेत शिकत होती. घरातील लोखंडी हुकला दोरीने तिने गळफास घेतला. या मुलीने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे अद्याप कळू शकलेले नाही. या घटनेचा तपास कराड पोलीस करत आहेत. अल्पवयीन मुलींनी केलेल्या या आत्महत्यांमुळे सातारा शहर आणि मलकापूर परिसरात खळबळ उडाली आहे.