मुंबई (वृत्तसंस्था) आर्यन खान प्रकरण काहीसे शांत होत असल्याचे दिसत असतानाच भाजप नेते मोहीत कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक दावा केलाय. आर्यन खान प्रकरण, कॉर्डेलिया क्रूझवर टाकलेला छापा आणि त्यानंतरची कारवाई या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाईंड सुनील पाटील नावाची व्यक्ती असल्याचा दावा मोहीत कंबोज यांनी केला. तसेच सुनील पाटील यांचा राष्ट्रवादीशीसंबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मोहित भारतीय म्हणाले की, सुनील पाटील हा सर्व प्रकरणाचा मास्टर माईंड आहे. सुनील पाटील हा राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसचा सदस्य असून तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखचा मित्र आहे. मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टीबाबत सुनील पाटील आणि सॅम डिसुझा यांच्यात व्हॉट्सअप संवाद झाला होता. अनिल देशमुख प्रकरणातही सुनील पाटीलचा समावेश आहे. किरण गोसावी हा भाजपाचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं गेले. परंतु किरण गोसावीचा नंबर सुनील पाटील यानेच सॅम डिसुझाला दिला होता. सुनील पाटीलच्या सांगण्यावरुनच किरण गोसावी याला व्ही. व्ही सिंग या अधिकाऱ्याला भेटवलं. किरण गोसावी हा मंत्री नवाब मलिकांचा माणूस असल्याचं त्यांनी सांगितले.
भाजपाची प्रतिमा मलीन करण्यासाठी आरोप लावले गेले
तसेच सुनील पाटील याला पुढे करून राज्य सरकारच्या मंत्र्यांनी एनसीबी विरुद्ध षडयंत्र रचलं गेले. सुनील पाटील यांच्यासोबत काय संबंध आहेत? याचे उत्तर राज्यातील जनतेला द्यायला हवं. राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सुनील पाटीलची भूमिका काय? एखाद्या अधिकाऱ्याला बदनाम करून महाराष्ट्रात ड्रग्स माफियांना मोकळं वातावरण करून द्यायचा कोणाचा डाव आहे? सुनील पाटील आणि सॅम डिसुझा यांच्यात ऑगस्टमध्ये संवाद झाला होता. सुनील पाटीलचा एक ऑडिओ क्लीप माझ्याकडे आला. ते मी तपास यंत्रणेकडे पाठवलं आहे. राज्यात बदलीचं रॅकेट सुनील पाटील चालवतो. मंत्र्यांनी ब्लॅकमेलिंगचं रॅकेट चालवून अधिकाऱ्यांना बदनाम केले गेले. केंद्रीय तपास यंत्रणा, भाजपाची प्रतिमा मलीन करण्यासाठी मागील काही दिवसांपासून हे आरोप लावले गेले असं मोहित भारतीय यांनी दावा केला. नवाब मलिक, सुनील पाटील यांचे कॉल रेकॉर्ड सर्वांसमोर आणावे सगळं सत्य बाहेर येईल असंही मोहित भारतीय म्हणाले.