जळगाव (प्रतिनिधी) शिवसेना-एमआयएमसह आता भारतीय जनता पक्षातून फुटून आलेल्या सदस्यांसह शिवसेनेसोबत सद्य: स्थितीत ४४ सदस्य आहेत. तसेच ७५ सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी ३८ सदस्यसंख्या हवी. सध्या आमच्याकडे शिवसेनेचे १५, एमआयएमचे तीन आणि भाजपतील २६ अशा एकूण ४४ सदस्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेनेचे सभागृह नेते नितीन लढ्ढा यांनी केला.
महापौरपदासाठी जयश्री महाजन यांचे नाव निश्चित केले असून, त्यांच्या नावाने व्हीप बजावण्यात येईल. उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचे नाव ठरविण्यात आले असले तरी पक्षाने त्यासंदर्भात वेगळा आदेश दिल्यास त्यानुसार ऐनवेळी निर्णय घेतला जाईल, असेही लढा म्हणाले.
जळगाव महापालिकेत ५७ सदस्यांसह स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपचे २७ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याचे बोलले जात आहे. शिवाय, सेनेला ‘एमआयएम’च्या तीन सदस्यांचाही पाठिंबा मिळणार असल्याने गुरुवारी (ता.१८) होणाऱ्या महापौर निवडीत सेनेची सरशी होईल, असा दावा केला जात आहे.