मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणानंतर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या निर्णयाचं स्वागत करत महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे एक प्रकारे महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या असंवैधानिक कृतीला ही एक थप्पडच आहे असं फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत म्हटले की, ‘राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या १२ आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार या निकालाचे आम्ही स्वागत करतो. हे निलंबन रद्द झाल्याबद्दल भाजपाच्या १२ आमदारांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो’, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, ‘हा निर्णय यासाठी महत्त्वाचा आहे की हे १२ आमदार राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो घोळ घातला, त्याविरुद्ध आवाज उठवत होते. अशा वेळी सभागृहात ज्या घटना घडला नाहीत त्यासाठी आणि उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये जी घटना घडली, त्याचे कपोलकल्पित रुप तयार करण्यात आले. आणि त्या आधारावर षडयंत्र रचून या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. आर्टिफिशियल बहुमत तयार करण्यासाठी १२ सदस्यांना वर्षभरासाठी निलंबित गेले गेले होतं. सर्वोच्च न्यायालयानं ही कृती असंवैधानिक ठरवली आहे. एक प्रकारे राज्य सरकार आणि त्यांच्या असंवैधानिक कृतीला ही थप्पड आहे.’ असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.