मुंबई (वृत्तसंस्था) सुशांत सिंह राजपूतची हत्या की आत्महत्या हे कोडे तीन महिने लोटले तरीही सुटलेले नसून राजकारणाचे वादळही शमलेले आहे. मात्र, आज एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतचा मृत्यू ही हत्या नव्हती असे म्हटल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयने आता लोकांना सांगावे, लवकरात लवकर चौकशीचा अहवाल द्यावा, अशी मागणी केली आहे.
‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने केलेल्या चौकशीचा रिपोर्ट, लवकरात लवकर यावा, जेणेकरुन लोकांना सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सत्य काय आहे हे कळेल, आतापर्यंत आम्हाला ॲाफीशियली याबाबत सीबीआयकडून काहीही माहिती मिळाली नाही’, असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. तर, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी प्रोफेशनल पध्दतीने तपास केला. यावर आता सर्वोच्च न्यायालय आणि एम्सच्या अहवालानंतर शिक्कामोर्तब झाले, असे म्हणत त्यांनी सीबीआयला टोला देखील लगावला आहे. दरम्यान, एम्सचा अहवाल समोर आल्यानंतर ‘महाराष्ट्राची बदनामी करण्याचा कट रचला गेला, मात्र एम्सच्या अहवालामुळे महाराष्ट्राची प्रतिमा पुन्हा एकदा सिद्ध झाली’, अशी प्रतिक्रिया शिवसेना नगरसेवक आणि आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी दिली आहे.
“दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने सुशांत सिंहची आत्महत्या झाल्याचा अहवाल दिला आहे. या अहवालामुळे राज्य सरकार मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस योग्य तपास करत होती हे सिद्ध होतंय. पण काहींनी महाराष्ट्राची बदनामी करण्याचा कट रचला गेला होता. एमच्या अहवालामुळे महाराष्ट्राची प्रतिमा पुन्हा एकदा सिद्ध झाली”, असे अमेय घोले म्हणाले.