जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह्य व अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी त्यांना तत्काळ निलंबित करावे, अन्यथा मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिला आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून म्हटले आहे की, फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप मला काल संध्याकाळी प्राप्त झाली होती. एका पोलीस अधिकाऱ्याची एखाद्या समाजाविषयीची भावना व वापरलेली भाषा पाहता अशा जातीयवादी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याचे तत्काळ निलंबन करण्यात येऊन त्याची चौकशी करावी अशी मागणी मी कालंच संध्याकाळी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्याकडे फोनवरून केली होती. मात्र मला प्राप्त माहितीनुसार सदर पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले याला नियंत्रण कक्षात जमा करण्यात आली आहे.
सदर ऑडिओ क्लिप अतिशय आक्षेपार्ह्य असून अशी प्रवृत्ती पोलीस प्रशासनात राहणे म्हणजे जातीयवादाला खतपाणी घालणे आहे. लोकप्रतिनिधी म्हणून कुठल्याही दोन समाजात सामंजस्य राखणे माझी जबाबदारी आहे. सदर आक्षेपार्ह्य ऑडिओ क्लिप समाजात प्रसारित झाल्यानंतर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाजात उमटतील याची जाणीव पोलीस दलाने ठेवावी. सदर पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले यांचे तात्काळ निलंबन करावे. तसेच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. अन्यथा येणाऱ्या काळात असंतोष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पूर्णपणे पोलीस दल जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी, असेही आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे.