छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) बेकायदेशीर दस्त नोंदणी आणि कमी मूल्यांकन दाखवून नोंदणी करीत ४८ लाख रुपये मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्काचे शासनाचे नुकसान केल्याचा ठपका ठेवून सिल्लोडचे दुय्यम निबंधक छगन उत्तमराव पाटील यांना शासनाने २९ फेब्रुवारी रोजी निलंबित केले. सकाळी निलंबनाचे आदेश सिल्लोड कार्यालयात धडकले. निलंबनाच्या आदेशाची अंमलबजावणी होण्यापूर्वीच पाटील याला कार्यालयातच ५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने अटक केली. दरम्यान, या कारवाईनंतर एसीबीने पाटीलच्या घराची झडती घेतली असता तब्बल १ कोटी ३५ लाख रुपये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
सिल्लोडच्या नोंदणी कार्यालयात दुय्यम निबंधक म्हणून छगन उत्तमराव पाटील कार्यरत आहेत. या कार्यालयाची नोंदणी विभागाने अंतर्गत तपासणी केली. त्यावेळी ७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२३ या काळात तुकडेबंदी कायद्याचे उलंघन करून तब्बल ४४ दस्तांची नोंदणी केल्याचे सोर आले. तर ४२ दस्तांमध्ये मुल्यांकन कमी करून दस्तांची नोंदणी करीत ४८ लाख ६ हजार २७३ रुपयांचा शासनाचा महसूल बुडाल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारे ८६ दस्तांमध्ये नोंदणी नियमांचा भंग केल्याचा ठपका चौकशी पथकाने पाटील याच्यावर ठेवला.
या चौकशी अहवालावरून २९ फेब्रुवारी २०२४ रोजी पाटील यांना निलंबीत केले. महसूल व वन विभागाचे उपसचिव सत्यनारायण बजाज यांनी हे आदेश काढले. पाटील यांच्या निलंबनाचे आदेश शुक्रवारी १ मार्च २०२४ रोजी सकाळीच उपमहानिरीक्षक आणि सह जिल्हा निबंधक कार्यालयात धडकले. सह जिल्हा निबंधक कार्यालयाने हे आदेश सिल्लोड दुय्यम निबंधक कार्यालयाला पाठविले. या आदेशाची अंमलबजावणी होऊन छगन पाटील यांच्यावर कारवाई होण्यापूर्वीच ५ हजार रुपयांची लाच घेताना १ मार्च रोजी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. छगन पाटील याचे निलंबन आणि लाच घेताना अटक या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्याने चांगलीच चर्चा रंगली होती.
सिल्लोडच्या नोंदणी कार्यालयात दुय्यम निबंधक म्हणून कार्यरत असलेल्या छगन पाटील याला लाच घेतांना पकडण्यात आल्यावर, एसीबीच्या पथकाने तात्काळ त्याच्या घरावर छापेमारी केली. यावेळी कारवाईसाठी गेलेल्या पथकाला देखील धक्का बसला. कारण पाटील यांच्या घरात तब्बल 1 कोटी 35 लाखांची कॅश पथकाला मिळून आली आहे. पथकाने याबाबतचा पंचनामा केला असून, छगन पाटील यांना देखील अटक करण्यात आली आहे.