जळगाव (प्रतिनिधी) : मेहरुण तलावातील गणेश घाटाजवळील पाण्यात सुमती रमेश सूर्यवंशी (वय ६८, रा. आदर्शनगर) या वृद्धेचा गुरुवारी सकाळी संशयास्पदरीत्या मृतदेह आढळून आला. सुमती यांनी आत्महत्या केली आहे का? की पाण्यात पाय घसरला, की घातपात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सर्व शक्यतांची पडताळणी करीत आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमती सूर्यवंशी या आदर्शनगरात कुटुंबीयांसह वास्तव्याला होत्या. गुरुवारी सकाळी १० वाजेच्या मेहरुण तलाव येथील गणेश घाटाजवळ त्यांचा पाण्यात मृतदेह आढळून आला आहे. हा प्रकार लक्षात येताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. सुमती या मेहरुण तलावाकडे का आल्या होत्या याचीही चौकशी केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, १ मुलगी असा परिवार आहे.