धरणगाव (प्रतिनिधी) सुमारे ११ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी खून प्रकरणात धरणगाव पोलिसांनी मुदतीच्या आत दि.२२ फेब्रुवारीला अर्थात ८६ व्या दिवशी न्यायालयात ३१३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान, या खुनाच्या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार पोलीस कर्मचारीच असल्यामुळे संपूर्ण राज्यभर हे प्रकरण गाजले होते.
एकूण सात आरोपी ; दोघांचा जामीन तर ५ कारागृहात !
स्वप्नील शिंपी खून प्रकरणात धरणगाव पोलिसांनी एकूण ७ आरोपींना अटक केली होती. त्यात १) नटवर किशोर जाधव (वय ३९ वर्षे रा. शिवकॉलनी, शिरुडनाका अमळनेर ता अमळनेर जि.जळगाव) २) कुणाल ऊर्फ सदाशिव वाणी (वय ४० वर्षे रा. चौगुले प्लॉट शनिपेठ, जळगाव), ३) विक्रम राजु सारवान (वय ३२ वर्षे रा. गुरु नानक नगर, शनिपेठ जळगाव) ,४) अंकुश किसन गवळी (वय ३६ वर्षे रा. गवळीवाडा, शनिपेठ, जळगाव) , ५) सनी धर्मराज पवार (वय २३ वर्षे रा. गुरुनानक नगर, शनिपेठ जळगाव), ६) अशोक जगदीश प्रजापत (वय २९ वर्षे रा.प्रजातप नगर, मुमुराबादरोड, जळगाव), ७) शशिकांत सुनील पवार यांचा समावेश होता. यातील विक्रम सारवान आणि शशिकांत पवार हे दोघं सध्या जामिनावर बाहेर आहते. दरम्यान, यातील नटवर जाधव हा पोलीस कर्मचारी आहे.
२६ पैकी २३ साक्षीदारांचे नोंदवले जबाब ; दोषारोप पत्रात भक्कम पुराव्यांचा समावेश !
स्वप्नील शिंपी खून प्रकरणात धरणगाव पोलिसांनी तांत्रिक मुद्द्यांसह कसून तपास केला होता. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्हीचे फुटेज, मोबाईलवरून आरोपी एकमेकाच्या संपर्कात असल्याचे पुरावे दोषारोप पत्रासोबत जोडली आहे. संपूर्ण तपासादरम्यान,पोलिसांना गुन्ह्याशी संबधित एकूण २६ साक्षीदार मिळाले. यातील २३ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान, दोषारोप पत्रात भक्कम पुराव्यांचा समावेश आहे.
काय होती नेमकी घटना?
जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवली. दुचाकीस्वाराला त्यांच्या कारने उडवल्याचा बहाणा करून पैशांची बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्याने पैशांच्या बॅगेवरील स्वत:ची पकड सैल होऊ न दिल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या मांडीवर, पोटावर चाकूने वार केले. तशाही अवस्थेत व्यापाऱ्याने महामार्गावर जोरात पळत बचावाचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यासह त्याच्यासोबतच्या कामगाराने प्रतिकार केल्यानंतर हल्लेखोर पैशांची बॅग सोडून पळून गेले. जखमी व्यापाऱ्याला तातडीने रुग्णवाहिकेत खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
आरोपींच्या पोलीस कोठडीसाठी पो.नि. शेळके यांनी स्व:त न्यायालयासमोर मांडले होते मुद्दे
आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी म्हणून तपासधिकारी पो.नि. शंकर शेळके यांनी स्वत: न्यायालयासमोर मुद्दे मांडले होते. तसेच बचावपक्षाचे मुद्दे खोडून काढले. आरोपींच्या मोबाईल सीडीआरमधून महत्वपूर्ण माहिती मिळू शकते, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. त्यावर बचाव पक्षाने मोबाईल सीडीआर काढण्यासाठी पोलीस कोठडीची गरज काय?, असे सांगितले. त्यावर तपासधिकारी पो.नि. शेळके यांनी सीडीआर आधीच काढलेला आहे. परंतू कोणत्या आरोपीला कुणाचा फोन आला किंवा त्याने कुणाला फोन लावला? याची माहिती स्वत: आरोपीच देऊ शकतो. त्यामुळे पोलीस कोठडी गरजेची असल्याचे न्यायालयाला सांगितले. तर ओळख परेडमध्ये चारच आरोपींना ओळखण्यात आल्यामुळे उर्वरित दोन आरोपींच्या पोलीस कोठडीची गरज नाही. यावरही तपासधिकारी पो.नि. शेळके यांनी सांगितले की, ओळख परेडशी पोलिसांचा काहीही संबंध नाही. त्याचा अहवाल अद्याप आमच्याकडे आलेला नाहीय. तसेच मूळ फिर्यादीत चार आरोपी होते. त्यानंतर इतर दोन आरोपी कटात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे अगदी वाढीव कलमांची परवानगी न्यायालाकडून घेण्यात आली आहे. दरम्यान, तपासधिकारी म्हणून पो.नि. शंकर शेळके यांनी न्यायालयात आरोपींच्या पोलीस कोठडीसाठी न्यायालयासमोर मांडलेल्या मुद्यांची त्यावेळी कोर्टाच्या आवारात एकच चर्चा होती.