जळगाव (प्रतिनिधी) सुमारे ११ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी खून प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्वपूर्ण सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. त्यानुसार घटनेच्या पूर्वी तिघं संशयित एका ठिकाणी एकत्र आलेत आणि त्याच ठिकाणी त्यांनी संपूर्ण कट रचल्याचे स्पष्ट होत आहे.
या संदर्भात अधिक असे की, फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ २६ नोव्हेंबरला रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवत चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणी १) नटवर किशोर जाधव (वय ३९ वर्षे रा. शिवकॉलनी, शिरुडनाका अमळनेर ता अमळनेर जि.जळगाव) २) कुणाल ऊर्फ सदाशिव वाणी (वय ४० वर्षे रा. चौगुले प्लॉट शनिपेठ, जळगाव), ३) विक्रम राजु सारवान (वय ३२ वर्षे रा. गुरु नानक नगर, शनिपेठ जळगाव) ,४) अंकुश किसन गवळी (वय ३६ वर्षे रा. गवळीवाडा, शनिपेठ, जळगाव) , ५) सनी धर्मराज पवार (वय २३ वर्षे रा. गुरुनानक नगर, शनिपेठ जळगाव), ६) अशोक जगदीश प्रजापत (वय २९ वर्षे रा.प्रजातप नगर, मुमुराबादरोड, जळगाव). या सहा जणांना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत. त्यांची पोलीस कोठडी १३ डिसेंबरला संपणार आहे. दरम्यान, यातील नटवर जाधव हा पोलीस कर्मचारी असून तोच या गुन्ह्याचा मास्टर माइंड असल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे.
पोलिसांकडून पुरावे गोळा करायला सुरुवात
सहाही संशयित आरोपी पोलीस कोठडीत आल्यापासून प्रत्येकाकडे गुन्ह्याबाबत माहिती घेतली जात आहे. दुसरीकडे पोलिसांनी घटना घडल्यापासूनच सीसीटीव्ही फुटेज गोळा करायला सुरुवात केली होती. त्यानुसार नुकतेच एक महत्वपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यानुसार यात तीन प्रमुख आरोपी एका ठिकाणी एकत्र जमले असून त्याच ठिकाणी त्यांना टीप मिळाली. त्यानंतर तिथंच कट रचला.
तीन मोटार सायकल जप्त
या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या तीन मोटारसायकली देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यात फिर्यादीत नमूद असलेली होंडा युनिकॉन मोटारसायकलचा देखील समावेश आहे. दरम्यान, जप्त मोटार सायकली कुणाच्या मालकीच्या आहेत. याबाबत आता पोलीस आरटीओकडून माहिती मिळवत असल्याचे कळते.
आरोपी मोबाईलवरून होते एकमेकाच्या संपर्कात
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकत्र जमल्यापासून तर खून करेपर्यंत तिघं आरोपी एकमेकाच्या संपर्कात होते. त्यांच्यामध्ये सतत संभाषण सुरु होते. याबाबतचा मोबाईल आणि टावर डाटा देखील पोलिसांनी मिळवला असल्याचे कळते. सध्या पोलीस या गुन्ह्याचा तपास अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने करत आहेत. त्यामुळे घटनेच्या पूर्वी आरोपी एकत्र दिसत असलेला सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या दृष्टीने महत्वपूर्ण पुरावा असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी म्हणून तपासधिकारी पो.नि. शंकर शेळके यांनी स्वत: न्यायालयासमोर मुद्दे मांडत बचावपक्षाचे मुद्दे खोडून काढले होते.