चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था पाहता आज राष्ट्रवादीचे डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या संकल्पनेतून रस्त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा अकुलखेडा येथे काढण्यात आली. यावेळी अकुलखेडा व राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते हजर होते.
चोपडा तालुक्यात जवळ जवळ सर्वच गावांमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.यामुळे अनेक लोकांचे जीवही जात असून शेकडो लोक जखमी देखील होत आहे. कोट्यावधीचा निधी येऊन देखिल हा निधी जातो कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधी रस्त्यांकडे का लक्ष देत नाही. या रस्त्यावर 260 व्यक्तींचे मृत्यू झाले आहेत, याला जबाबदार कोण?, असा सवाल उपस्थित होत असून कमिशनच्या पुढे जनता हतबल झालेली असली तरी आता मात्र शासन व प्रशासनाने जागे व्हावे व मेलेल्या रस्त्याचे टाळू वरील लोणी कोणी खाऊ नये यासाठी आम्ही प्रतीकात्मक अंतयात्रा काढत असल्याचे डॉ.चंद्रकांत बारेला यांनी सांगितले.
निर्धाढवलेले अधिकारी व लोकप्रतिनिधी असेच पैसे खात राहतील. त्यामुळे आम्हाला हे अनोखे आंदोलन करून शासनाच्या व प्रशासनाच्या लक्षात आणून द्यायचे आहे. यावेळी या सरकारचे काय करायचे खाली डोके वरती पाय…. 50 खोके ओके बाय बाय… रस्त्यात खडे…की, खड्यात रस्ते…अश्या विविध घोषणा देण्यात आल्या.
यावेळी डॉ. चंद्रकांत बारेला, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक पाटील, चोपडा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अतुल नाना पाटील, चोपडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक चे चेअरमन चंद्रासभाई गुजराथी, प्रा.शरद पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शशी पाटील,अमोल राजपूत, निलेश जाधव,डॉ. भरत धनगर, सचिन ढाबे, भालेराव पाटील,शशी देवरे, शाम परदेशी, भरत इंगळे,ईश्वर सुर्वेवंशी,योगेश पाटील,किशोर सोनवणे, सुनिल महाजन, फकिरा तडवी, प्रफुल्ल स्वामी आदी मंडळी हजर होती.
नेत्यांची अनुपस्थिती !
चार-पाच दिवसापासून सोशल मीडियावर प्रतिकात्मक अंतयात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले जात होते. परंतू तरिही राष्ट्रवादीचे नेतेमंडळींनी या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला पाठ फिरवली. नेत्यांपैकी कोणीही हजर दिसत नसल्याने उपस्थित असलेले काही ठराविक लोकांचे चेहरे हिरमुसले. बोटावर मोजण्याइतके लोक हजर असल्याने अंतयात्रा काढून घ्यावी लागली.