भुसावळ (प्रतिनिधी) फेकरी ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या अनागोंदी व भ्रष्ट कारभाराबद्दल दोषींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा दि. १५ ऑगस्ट रोजी भुसावळ प्रांत कार्यालय येथे लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा संतोष कचरू मेश्राम, विकास कौतिक वाघोदे, आकाश निवृत्ती सपकाळे यांनी भुसावळ प्रांतधिकार्यांना एका तक्रार निवेदनाद्वारे दिला आहे.
तक्रार निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत फेकरी येथे शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत (मगांराग्रारोहयो, घरकुल योजना, दलित वस्ती सुधार योजना, विविध आरोग्य योजना,१४ वित्त आयोग आणि इतर शासकीय योजना) मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, नित्कृष्ट दर्जाचे बांधकामे, घरकुल आवास योजनेंतर्गत सधनाना लाभ देऊन खऱ्या लाभार्थींना वंचित ठेवणे, गावकऱ्यांना विविध योजनांच्या माहितीपासून वंचित ठेवणे, माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती न देणे, अपिलीय अधिकारी यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करणे तसेच जि.प. मराठी शाळेच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाच्या कामाची चौकशी न करता सदर चौकशी निकाली काढणे, वृत्तपत्रातून चुकीची माहिती प्रसिद्ध करून गावकऱ्यांची दिशाभूल करणे तसेच गावात घाणीच्या साम्राज्याचा परिस्थितीवर उपाययोजना न करता गावकऱ्यांचे आरोग्य आणि जिवीतास धोका निर्माण करणे, कोरोना महामारी काळात फक्त कागदोपत्री उपाययोजना करून गावात कोणतीही उपाययोजना न करणे आणि अशा प्रकारची बेजबाबदार कामे सरपंच ग्रामपंचायत फेकरी, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत फेकरी, गटविकास अधिकारी पंचायत समिती भुसावळ आणि तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहेत.
सदरकामी दोषींवर कायदेशीर कार्यवाही करून गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे मांगितलेल्या सर्व माहित्या लवकरात लवकर उपलब्ध करून ग्रामपंचायत फेकरी येथील भ्रष्ट कारभाराबाबत कार्यवाही करुन सरपंच ग्रामपंचायत फेकरी यांना अपात्र करावे. सदर सर्व मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने प्रांत कार्यालय भुसावळ समोर दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वा.पासून उपोषण करणार आहोत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.