मुंबई (वृत्तसंस्था) स्वच्छ भारत मिशन माध्यमातून स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोरोना सारख्या महामारी रोखण्यासाठी हातांची स्वच्छता महत्वाची भूमिका बजावत आहे. आपले आरोग्य आपल्या हाती आहे. स्वच्छ हात धुवून आपले आरोग्य सांभाळले पाहिजे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले.
दिनांक १५ ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे,जिल्हा स्तरावरून सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकरी अधिकारी,गटविकास अधिकारी,ग्रामसेवक,सरपंच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले, दरवर्षी या दिवसाची संकल्पना ठरवली जाते. या वर्षी `आपले भविष्य आपल्या हातात आहे. त्यासाठी सर्वजण मिळून पुढे जाऊ या’ ही संकल्पना घेऊन हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आपल्या हातावर असणाऱ्या असंख्य रोगजंतू आपल्या आरोग्यासाठी बाधक ठरू शकतात. या रोगजंतूना साबणाने हात देऊन दूर केले तर सर्वांचाच भविष्यकाळ आरोग्यसंपन्न राहील. या अनुषंगाने जागतिक हात धुवा दिन निमित्ताने विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात यावी.
साबणाने हात धुण्याच्या सवयीमुळे श्वसन रोगाचा मृत्यु दर २५ टक्के कमी होऊ शकतो आणि अतिसार रोगामुळे होणारे मृत्यू सुद्धा ५० टक्के कमी होऊ शकतो. हात धुण्याच्या सवयी समाजात रुजविण्यात करिता व्यापक जनजागृती कार्यक्रम राबवावे. कोरोना महामारीमुळे जवळपास २ वर्ष बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू होत आहेत. शाळा स्तरावर देखील शालेय विद्यार्थ्यांमध्येही साबणाने हात धुण्याची सवय व्हावी याकडे प्रयत्न पूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. असेही ना. पाटील यांनी सांगितले.
या जागतिक हात धुवा दिनानिमित्त पाच दिवस राज्यभरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन आरोग्य संवर्धनाच्या कामात पुढाकार घ्यावा असे सांगून स्वतः हात धुवून हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक दाखवले. दरम्यान हात स्वच्छता संदर्भात तयार केलेल्या चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले.