भुसावळ (प्रतिनिधी) खाकीचा धाक दाखवत लेखनीच्या शिलेदाराला बेदम मारहाण करुन लुटणाऱ्या तसेच जीवेठार मारण्याची धमकी देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी. अशी मागणी पिडीत पत्रकाराने पोलिस अधीक्षक, जळगाव व जिल्हाधिकारी, यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिपनगर ता. भुसावळ येथील दैनिक लोकमतचे सुमित अशोक निकम हे दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास अपघाताची बातमी संकलनासाठी गेले असता तेथुन परत घरी जात असतांना भुसावळ – दिपनगर बायपास जवळील सटमाय माता मंदिराजवळ पोलिस कर्मचारी सुरेश महाजन व त्यांचे सोबत एक अज्ञात इसम यांनी सुमित निकम यांची मोटरसायकल अडवुन त्यांचे काही एक न ऐकुन घेता त्यांचे जवळील दंड्याने मारहाण सुरु केली. सुमित यांनी मी पत्रकार आहे. तुम्ही मला का मारत आहात ? अशी विचारणा केल्यानंतर सुद्धा दोघांनी सुमित यास मारहाण सुरुच ठेवली व सुमित निकम यांचे खिश्यातील १० हजार रुपये रोख, २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व चैन मधील ३ ग्रॅम वजनाचे पदक अशा मुद्देमालासह सुमित यांचे जवळील दैनिक लोकमतचे ओळख पत्र हिसकावुन घेतले. व सुमित यास पुन्हा मारहाण करुन जिवेठार मारण्याची व तुला खोट्या गुन्ह्यात अडकवु अशी धमकी देत तेथुन पसार झाले. सुमित निकम यांनी कसेबसे करत उपचारार्थ रुग्णालयात दाखल झाले. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर सुमित यांनी भुसावळ तालुका पोलिस स्टेशन गाठले. परंतु त्यांची कैफियत संबंधित अधिकाऱ्यांनी ऐकुन न घेतल्याने सुमित निकम यांनी दि. ५ जानेवारी २०२१ रोजी पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची भेट घेऊन सदरील घटनाक्रम सविस्तर सांगितला असता पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आश्वासन सुमित निकम यांना दिले आहे. सदर अर्जाची एक प्रत जिल्हाधिकारी, जळगाव यांनाही देण्यात आली आहे. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणीही सुमित निकम यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.