धरणगाव (प्रतिनिधी) विवरे गावात नुकतेच वैचारीक कार्यक्रमातून सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त तात्यासाहेबांच्या जीवन कार्याला उजाळा देण्यात आला. तसेच पी. डी. पाटील यांनी महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन करून राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांचे जीवन कार्य विस्तृतपणे गावकर्यांना सध्या – सोप्या भाषेत समजावून सांगितले.
विवरे ग्रामस्थांनी वैचारिक व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले हायस्कूल चे उपशिक्षक पी. डी. पाटील , हेमंत माळी व छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा फुले समता परीषदेचे तालुका अध्यक्ष धनराज माळी यांनी केले.
याप्रसंगी प्रमुख वक्ते व गावातील ग्रामस्थांच्या वतीने दीप प्रज्वलन करण्यात आले. कुळवाडी भूषण – बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज , राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले , विद्येची देवता सावित्रीमाई फुले , आरक्षणाचे जनक शाहू महाराज , भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
विवरे गावातील ग्रामस्थांच्या वतीने प्रमुख वक्ते पी. डी. पाटील , हेमंत माळी व लक्ष्मण पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. धनराज माळी यांनी प्रमुख व वक्त्यांचा परिचय करून दिला. वडाला फेऱ्या मारण्यापेक्षा आणि वैभवलक्ष्मी व्रतचे पुस्तक एकमेकींना देण्यापेक्षा विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांचे ग्रंथ वाचा व महापुरुषांचे लहान – लहान ग्रंथ एकमेकांना भेट द्या असे प्रतिपादन हेमंत माळी यांनी केले.
शिवजयंतीचे खरे जनक व पुण्यामध्ये प्रथम दहा दिवसाची शिवजयंती साजरी करणारे सत्यशोधक महात्मा ज्योतीराव फुले आहेत असे प्रतिपादन लक्ष्मण पाटील यांनी केले. या वैचारीक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील आधार काशिनाथ माळी ,गणेश पुंडलिक पाटील , धनराज रामकृष्ण माळी , नगराज महादू माळी , सुरेश विश्राम माळी , गोकुळ शहादु महाजन , दिलीप शंकर महाजन , धनराज योगराज माळी तसेच गावातील तरुण विद्यार्थी – रोशन गणेश माळी , फुलकेश मेघराज माळी , सतीश जुलाल माळी , खुशाल संजय माळी , सागर कैलास माळी यांच्यासह माळी महासंघ , महात्मा फुले युवा क्रांती मंच चे सर्व समता सैनिक, श्री. गणेश मित्र मंडळ विवरे व समस्त ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विवरे गावातील ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वैचारिक कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष धनराज माळी यांनी केले.