श्रीगोंदा (वृत्तसंस्था) जेवणाचा बहाणा करत पत्नीला हॉटेलमध्ये घेऊन जात कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून पतीने मित्राच्या सहाय्याने दोन वेळा सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना श्रीगोंदा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह त्याचा मित्र, पीडित महिलेच्या सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१४ साली तिचे श्रीगोंदा शहराजवळील गावातील तरुणाशी विवाह झाला. मात्र, घरातील काम व्यवस्थित करता येत नाही, माहेराहून पैसे आणले नाहीत, आदी कारणांवरून पतीसह सासू-सासरे वेळोवेळी तिचा छळ करत होते. या छळाला कंटाळून पीडित महिला आठ महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी पतीने तिला पुन्हा नांदवण्यास आणले आणि जेवणाच्या बहाण्याने श्रीगोंदा शहरातील एका हॉटेलवर नेले. तेथे कोल्ड्रिंक्समध्ये दारू टाकून तिला पाजली. त्यानंतर पीडितेच्या पतीचा याच हॉटेलमधील मित्र असलेल्या वेटरच्या सहाय्याने नशेत असलेल्या पत्नीवर सामूहिक अत्याचार करत व्हिडिओ चित्रीकरण केले. ही घटना पीडित महिलेने तिच्या सासू-सासऱ्याला सांगितली असता त्यांनी तिला ‘तुझा नवरा जे सांगेल, ते गुपचूप कर,’ असे सांगत तिला गप्प राहण्यास सांगितले.
काही दिवसांनी पतीने तिला पुन्हा बळजबरीने हॉटेलमध्ये घेऊन जात कोल्ड्रिंक्समधून पुन्हा दारु पाजत अत्याचार केला. तसेच घडलेली घटना कोणाला सांगितली, तर व्हिडिओ चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली. अखेर या पीडितेने घडलेली गोष्ट माहेरी सांगितली. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्य फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि हॉटेलमधील वेटर यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.