जळगाव (प्रतिनिधी) महापालिकेतील नगर रचना सहाय्यक मनोज समाधान वन्नेरे यास आज जळगाव एसीबीने 15 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
तक्रारदार यांच्या बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराच्या भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण मंजूर करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. सुरुवातीला तीस हजार रुपये मागण्यात आले. नंतर तडजोडीनंतर मनोज वन्नेरे यांनी पंधरा हजार स्वीकारले. एसीबीच्या या कारवाईमुळे महापालिकेचे वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, किशोर महाजन, राकेश दुसाणे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. दरम्यान, या कारवाईने जळगाव महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याही अडचणी वाढल्या असून त्यांच्या नावानेही लाच मागण्यात आल्याने त्यांना सोमवारी सायंकाळी एसीबीने चौकशीसाठी बोलावल्याचे सूत्रांनी सांगितले.
















