जळगाव (प्रतिनिधी) ईडी कार्यालयातून बोलत असून तुमचे बँक खाते मनी लॉन्ड्रींगमध्ये आलेय, अशी थाप मारून कारवाईची धमकी देत शहरातील एका नामांकीत डॉक्टरकडून तब्बल १९ लाख २० हजार रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिस ठाण्यात डॉक्टरांनी फिर्याद दिली. त्यानुसार फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील ५९ वर्षीय एक नामांकीत डॉक्टर वास्तव्यास आहे. त्यांच्यासोबत दि. १ मे रोजी अंकुश वर्मा आणि सुनीलकुमार नामक व्यक्तींनी संपर्क साधला. त्यांनी आम्ही इंडी कार्यालयातून बोलत असून मनी लॉन्ड्रींगमध्ये तुमचे बैंक खाते आले आहे. त्यामध्ये तुमचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. त्यातून बाहेर पडायचे असेल तर आम्ही सांगू तसे वागा असे त्या व्यक्तींनी डॉक्टरांना सांगितले. त्यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक पाठवून त्यामध्ये पैसे टाकण्यास सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या या डॉक्टरांनी दि. १ मे ते दि. १८ मेपर्यंत संशयितांच्या खात्यात एकूण १९ लाख २० हजार रुपये ट्रान्सफर केले.
मात्र, आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर या डॉक्टरांनी सोमवार दि. २० मे रोजी सायबर पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदविली. त्यानंतर मंगळवारी त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष येऊन फिर्याद दाखल दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.