अकोला (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील धामणदरी (ता. बार्शीटाकळी) या दुर्गम गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या चार विद्यार्थिनींवर तेथील दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केले. सुमारे दोन महिने हा प्रकार सुरू होता. पालकांना तो समजल्यानंतर त्यांनी बुधवारी बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी सहायक शिक्षक सुधाकर रामदास ढगे (५३) व राजेश रामभाऊ तावडे (४५, दोघे रा. अकोला) या नराधमांना तातडीने अटक करण्यात आली आहे.
चारही मुलींवर दोन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार !
अकोल्यापासून ३० ते ४० किमी अंतरावर धामणदरी हे छोटेसे गाव आहे. या गावात जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून तिथे फक्त चार मुली व पाच मुले शिक्षण घेतात. या शाळेत सुधाकर ढगे व राजेश तायडे हे दोनच शिक्षक कार्यरत होते. त्यांच्या विश्वासावर पालक दहा वर्षांच्या मुलींना शाळेत पाठवत होते. मात्र, शिक्षक पेशाला काळिमा फासत या दोन नराधमांनी चारही मुलींवर दोन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरु केले होते. वारंवार घडणाऱ्या या कृत्यामुळे भयभीत झालेल्या मुलीनी शाळेत जाणेच बंद केले होते. पालक त्याबाबत विचारणा करत, मात्र घाबरलेल्या मुली काहीच बोलत नव्हत्या.
असा उघड झाला प्रकार !
एका मुलीने अखेर पालकांना खरे कारण सांगितले. तेव्हा शिक्षकांकडून होणाऱ्या अत्याचाराचा प्रकार समोर आला. या पालकांनी इतर तीन कुटुंबांशी संपर्क साधला. अखेर चारही पालकांना अत्याचाराबाबत माहिती मिळाली. त्यांनी बुधवारी बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी तत्काळ दोन्ही नराधम शिक्षकांना अटक केली व त्यांच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. दुसरीकडे पोलिसांकडून कारवाईची माहिती मिळताच जिल्हा परिषद सीईओ यांनीही ढगे व तायडे या दोन्ही शिक्षकांना ६ एप्रिलपासून तातडीने बडतर्फ केले.