भुसावळ (प्रतिनिधी) शहरात पालिकेच्या शाळा क्र. २७ मध्ये उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाला न्यायालयाने दोषी ठरवीत पाच वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनवली आहे. तौसीफुद्दीन फरीदउद्दीन असे शिक्षा सुनावलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, ओंकारेश्वर मंदिराजवळील पालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा तौसीफुद्दीन फरीदउद्दीन (रा. जळगाव) हा शिक्षक पाच ते सहा महिन्यांपासून सतत विनयभंग करत होता. या प्रकरणी पीडित मुलीने फेब्रुवारी २०१६ मध्ये घरातील महिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर घरातील पुरुष मंडळी कामानिमित्त बाहेर असल्याने महिलांनी विद्यालय गाठले. तोपर्यंत शिक्षक पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीचे वडील व आप्तांसह आजोबांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तौसीफउद्दीन याच्याविद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भुसावळ येथील मे. सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनवाई सुरु होती.त्यानुसार आज आरोपी तौसुफुद्दीन फरिदुद्दीन (वय ५५) यास दोषी धरून आज रोजी न्यायालयाने कलम ३४५ अ प्रमाणे एक वर्ष सक्त मजुरी व ५ हजाराचा दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरी आणि पोस्को (POCSO) अॅक्ट कलम १० प्रमाणे ५ वर्ष सक्त मजुरी व ५ हजाराचा दंड तर दंड न भरल्यास १ महिना सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी अभयोक्ता विजय खडसे यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यात पिडीत मुलगी, फिर्यादी तसेच तपासाधिकारी आर. एम. वसत्कर यांची साक्ष महत्त्व पूर्ण ठरली. आरोपीतर्फे अॅड. सागर चित्रे (जळगाव) यांनी तर पैरवी अधी. स. फौजदार समिना तडवी यांनी काम पाहिले.