मुंबई (वृत्तसंस्था) दहावी, बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच ऑफलाईनच होणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलंय. या वर्षात मुलांचा लेखन सराव कमी झाल्याने मुलांना पेपर लिहीण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ देण्यात येणार आहे. त्यासाठी पेपर सकाळी १०:३० वाजता सुरू होईल.
दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा येत्या एप्रिल अखेर पासून सुरू होणार आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन या चर्चांना वर्षा गायकवाड यांनी पूर्णविराम दिला असून, महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती पाहता परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्या लागणार आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र असणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
कधी होणार परीक्षा ?
दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २१ दरम्यान होईल.
बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २० मे दरम्यान होईल.
लेखी परीक्षेनंतर १५ दिवसांनी प्रॅक्टिकल परीक्षा होईल.
२२ मे ते १० जून दरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा होईल.
दहावी बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत वा कॉलेजमध्ये ही परीक्षा देण्यात येईल. त्या शाळेतले वर्ग कमी पडल्यास जवळच्या शाळाही केंद्र म्हणून वापरण्यात येतील. शिवाय या काळात विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास त्यांच्यासाठी जून महिन्यामध्ये विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे.
पेपर लिहायला जास्त वेळ
गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव जास्त झालेला नाही. हे लक्षात घेत पेपर लिहीण्यासाठीची वेळ वाढवण्यात येत असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं.
४० ते ५० मार्कांच्या पेपरसाठी १५ मिनिटं जास्त वेळ देण्यात येईल. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटांचा जास्त वेळ देण्यात येईल. पेपर एकूण साडेतीन तासांचा असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपरसाठी १ तासाचा जास्तीचा वेळ देण्यात येईल. पास होण्यासाठीच्या ३५ मार्कांच्या पातळीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय.