मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईच्या लालबाग इथं साराभाई इमारतीतील बंद खोलीत गॅस बाटल्याचा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण स्फोटामध्ये तब्बल १३ स्थानिक जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक दिवसापासून हा खोलीमध्ये गॅस लीकेजचा वास येत होता. वास कुठून येतोय हे पाहण्यासाठी स्थानिक गेले असता अचानक स्फोट झाला. यामुळे परिसरातील तब्बल १३ स्थानिक आगीत होरपळून जखमी झाले आहेत.
सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडली असून अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटामध्ये ३ महिला आणि १० पुरूषांवर केईएम अतिदक्षता विभागात ऊपचार सुरू आहेत. या घटनेमध्ये संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नेमका गॅस लीक का होत होता? तर ही खोली कोणाची आहे? याकडे आधीच लक्ष का दिलं गेलं नाही? याचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुदैवाने लालबागच्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण घरातील सिलेंडर काम नसेल तेव्हा बंद करून ठेवणं महत्त्वाचं आहे. सिलेंडरमधून जर गॅसचा वास येत असेल तर तात्काळ त्याची माहिती संबंधित विभागाला देऊन सुरक्षिततेने त्याला दुरुस्त करावं. याने मोठा अनर्थ टाळता येऊ शकतो.