जळगाव (प्रतिनिधी) मुलीला शाळेत घेण्यासाठी गेलेल्या विवाहिता दीड दिवसानंतर शिरसोली शिवारातील शेतामधील विहरीत पाईपाला धरुन बसलेली होती. महिलेने आपल्याला रिक्षा चालकाने गुंगीचे औषध दिले, त्यानंतर काय झाले हे काहीच आठवत नसल्याची, आपबिती पोलिसांना सांगितली. दरम्यान, संबंधित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.
रिक्षा चालकाने दिले विवाहितेला गुंगीचे औषध !
शहरातील नेहरु नगरात दीपीका दीपक पाटील (वय २६) या विवाहिता वास्तव्यास आहेत. दि. २४ जून रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास या विवाहिता मुलीला घेण्यासाठी जाते असे सांगून घरातून निघाल्या. शाळेकडे जात असतांना रस्त्यात एका रिक्षा चालकाने विवाहितेला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर विवाहितेची शुद्ध हरपली आणि थोड्यावेळानंतर विवाहिता शुद्धीवर आल्यानंतर ती थेट विहरीत पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, दुपारपासून विहिरीत पडलेल्या विवाहितेने तेथील पाईपाला धरुन बसली होती. सपुंर्ण रात्र विवाहितेने विहरीतच काढली.
ग्रामस्थांच्या मदतीने काढले बाहेर !
घटनेची माहिती शेतकरी गजानन सोनवणे यांनी लागलीच पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने विवाहितेला विहरीतून सुखरुप बाहेर काढले. दरम्यान, महिला प्रचंड घाबरलेली असल्याने तीला व्यवस्थीत बोलता देखील येत नव्हते. विवाहितेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शाळेतून गेला मुलीच्या वडीलांना फोन !
शाळा सुटल्यानंतर बराच वेळ झाला तरी विवाहिता मुलीला घेण्यासाठी शाळेत पोहचली नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी मुलीच्या वडीलांना फोन केला. मात्र दीपीका पाटील यांच्यासोबत संपर्क होत नसल्याने त्यांनी दीपक पाटील यांनी मुलीच्या काकूला शाळेत मुलीला घेण्यासाठी पाठवले होते.
विहिरीतून आवाज आला अन् नागरिक मदतीला धावले !
मंगळवारी सकाळी शिरसोली येथील शेतकरी गजानन सोनवणे व त्यांच्या पत्नी वंदना सोनवणे या शेतात काम करीत होते. यावेळी त्यांना विहिरीतून कोणीतरी ओडत असल्याचा आवाज आला. त्यांनी विहरीजवळ जाऊन पाहिले असता एक महिला पाईपाला धरून विहिरीत असल्याचे दिसले.
पतीने दिली पत्नी हरविल्याची तक्रार !
मुलीला शाळेत घेण्यासाठी गेलेली विवाहिता रात्रभर देखील घरी न परतल्यामुळे सोमवारी दीपक पाटील यांनी एमआयडीसी पोलीसात पत्नी हरविल्याची तक्रार दिली. मंगळवारी दुपारच्या सुमारास महिलेला गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, पोलिसांनी दीपक पाटील यांच्यासोबत संपर्क साधून पोलीस ठाण्यात बोलावले. दरम्यान, विहरीत पडलेली विवाहिता त्यांची पत्नी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी विवाहितेला नातेवाईकांच्या स्वाधीन केले
कौटुंबिक वादाचा दिला जबाब
दरम्यान, दीपिकाने घटनास्थळावर सांगितलेली हकिगत व पोलिसांत दिलेल्या जबाबात तफावत आढळून येते आहे. जळगाव येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात कुटुंबात पत्ती आणि सासूशी होत असलेल्या वादाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाचा जबाब तिने पोलिसांकडे नोंदवलेला असल्याचे कळतेय.
















