परभणी : मानवत तालुक्यातील नागरजवळा या गावातील एक भाऊ मानवत येथे बहिणीच्या लग्नाचे सामान घेऊन परत येत असताना गावाच्या जवळच आल्यावर त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२९) सायंकाळी ७ ते ७-३० वाजेच्या दरम्यान घडली. पांडुरंग बाबासाहेब होगे, असे मयत तरुणाचे नाव आहे. मृतदेह बघताच कुटुंबियांनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता.
नागरजवळा येथील होगे कुटुंबात रविवारी मयत पांडुरंग यांच्या बहिणीचे लग्न झाले. हे लग्न गेटकीण पद्धतीने करण्यात आले होते. लग्न गेटकीन पद्धतीने झाल्याने बहिणीस काही सामान देण्यात आले नव्हते म्हणून २९ मे रोजी होगे कुटुंबीय मानवत येथे सकाळी ११ वाजता सामान घेण्यासाठी आले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सामान खरेदी करून वडिलांच्या हस्ते ऑटोने सामान बहिणीच्या घरी पाठवून दिले. सामान घेऊन परत येत असताना पांडुरंग बाबासाहेब होगे हा त्याच्या जवळ असलेल्या पॅशन प्रो गाडी (एम.एच. २२ ए.एच. ६८७२) ने परत येत असताना नागरजवळा गावाच्या १ कि.मी. अलीकडे साहेबराव बन्सीधर होगे यांच्या शेताजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टर (एम. एच. २१ डी ३५६८) ट्रॉलीला धडकला.
या धडकेत तो गंभीर जखमी झाला. घटना कळताच गावातील नागरिकांनी त्याला तात्काळ मानवत येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले. परंतु खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ट्रॅक्टर (एम.एच.२१ डी ३५६८) चालकावर मृत्यूस कारणीभूत म्हणून भांदविच्या कलम ३०४ अ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास मानवत पोलीस करीत आहे.