नागपूर (वृत्तसंस्था) महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या नागपूर युनिटने एक महत्वाची कारवाई केली आहे. शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी करणारा दहशतवादी अखेरीस एटीएसच्या ताब्यात आला आहे. दहशतवादी रईस अहमद असदउल्लाह शेख या दहशतवाद्याला नागपूर एटीएस पथकाने ताब्यात घेतलं आहे.
दहशतवादी रईस अहमद शेख सदाउल्ला शेख याला काश्मिर पोलिसांनी जानेवारी महिन्यात अटक केली होती. १५ जुलैला नागपूरात येऊन रईस शेख याने संघ मुख्यालय आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी केली होती. याबाबत नागपूरात कोतवाली पोलिसांनी रईस शेख विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने काश्मिरमध्ये जाऊन रईस शेखला अटक केली आहे. नागपूर एटीएस दहशतवादी रईस शेखची कसून चौकशी करत आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
रईस अहमद शेख या दहशतवाद्याने नागपूरात संघ मुख्यालय परिसराची रेकी केली होती. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून ही रेकी करण्यात आली होती. १३ ते १५ जुलै २०२१ दरम्यान संघ मुख्यालय परिसराची रेकी केल्याची माहिती पोलीसांनी मिळाली होती.
संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवतांचं वास्तव्य असतं. शिवाय संघाच्या वरिष्ठ नेत्यांचा आणि भाजप नेत्यांचा या परिसरात वावर असतो. यापूर्वीही संघ मुख्यालयावर दहशतवादी हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. संघ मुख्यालयाचा अतिशय संवेदनशील वास्तूंमध्ये समावेश होतो. संघ मुख्यालयासह नागपुरातल्या अनेक महत्त्वाच्या भागांची रेकी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून पोलिसांनी या सर्व भागातला बंदोबस्त वाढवला होता. पोलीस या भागातल्या हालचालींवर नजर ठेऊन होते.