पुंछ (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी गोळीबार करत मोठा हल्ला केला आहे. ग्रेनेडने जोरदार हल्ला केल्यामुळे वाहनाला भीषण आग लागली. यात पाच जवान शहीद झाले आहेत.
जम्मू-कश्मीरच्या राजौरी सेक्टरमधील भीमबेर गल्ली आणि पुँछदरम्यान सैन्याच्या ट्रकवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले आहेत. गोळीबारादरम्यान ट्रकला आग लागली. त्यामुळे दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केल्याचाही संशय आहे. तर दहशतवादी संघटना जैश समर्थित PAFF म्हणजेच पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट म्हणजेच PAFF ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद समर्थित दहशतवादी संघटना आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या भागात दहशतवादविरोधी कारवाईसाठी तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचे पाच जवान या घटनेत शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर जोरदार पावसामुळे दृश्यमानता कमी होती. याचा फायदा घेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला. शहीद झालेले पाच जवान दहशतवादविरोधी मोहिमेसाठी तैनात असल्याची माहिती सैन्यामार्फत समोर येत आहे.
घटनास्थळावरून पाच जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. परंतू इतर जवानांचा शोध लागू शकला नाही, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा दहशतवादी हल्ला पुंछमधील भाटा धुरियन भागातील महामार्गावर झाला आहे. सुरुवातीला वीज पडल्याने हा स्फोट झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, हा दहशतवादी हल्ला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.