नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात आता २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासारख्या घटना घडू शकत नाही,आपल्याला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची घटना कधीही विसरता येणार नाही, कारण तेव्हा देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्यात आले होते, परंतु आम्ही देशवासियांना हमी देतो की, यापुढे भारतात अशा प्रकारचा कोणताही हल्ला होणे शक्य नाही. असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे.
हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट कार्यक्रमात सिंह बोलत होते. संरक्षणमंत्री म्हणाले की, देशाचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण अशा प्रकारे तयार केले गेले आहे की देशात कुठल्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला होणे अशक्य आहे. नगरोटा हल्ल्याचा संदर्भ देत राजनाथ सिंह म्हणाले की, सुरक्षा दलांनी मोठा कट उधळून लावला आहे. विशेष म्हणजे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला गुरुवारी १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. सिंह म्हणाले की, भारताकडून दहशतवादाविरोधात ३६० डिग्री कारवाई केली जात आहे. भारत आता केवळ स्वतःच्या सीमेतच नाही तर गरज असेल तेव्हा आपले शूर जवान सीमा पार करुन दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करत आहेत. गेल्या १२ वर्षांमध्ये आम्ही भारतात अस्तित्वात असलेल्या दहशतवाद्यांशी संबंधित प्रत्येक गोष्ट उध्वस्त केली आहे. आता दहशतवाद्यांचे आर्थिक जाळे उध्वस्त करण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत.
भारत-चीन सीमेवरील तणावाबाबत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, भारताला युद्ध नको आहे, परंतु कोणीही भारताच्या एक इंच जमिनीकडेही पाहू नये. इतिहास साक्षीदार आहे की, भारताने कधीही कोणत्याही देशावर हल्ला केलेला नाही. कोणत्याही देशाची इंचभर जमीन भारताने बळकावलेली नाही. भारताला कोणत्याही प्रकारचे युद्ध नको आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या युद्धासाठी आपण सज्ज असणं आवश्यक आहे.