मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊनला विरोध करत कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी त्यांनी एक फॉर्म्यूला सांगितला आहे. फडणवीसांनी ट्विट करत ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ ही त्रिसूत्रीच कोरोनाला थोपवू शकते असं म्हटलंय.
“राज्यात लॉकडाऊन नाही तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय आहे. १० दिवसांत सरासरी १,२६,९५० चाचण्या दररोज होत आहेत. दैनंदिन चाचण्या १ लाखांवर जाण्यासाठी महाराष्ट्राला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची वाट पहावी लागली. येणार्या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवायला हवी. राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. आता तरी हे सूत्र कायम ठेवा,” असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
राज्यात शुक्रवारी दिवसभरात ३६,९०२ नवे कोरोना रुग्ण आढळले होते. तर एकूण १७,०१९ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चारर्ज देण्यात आला होता. शुक्रवारची आकडेवारी मिळून राज्यात आतापर्यंत २३,०००,५६ रुग्ण कोरोनातून नुक्त झाल्याची नोंद करण्यात आली. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८७.२ टक्क्यांवर आले आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनामुळे एकूण ११२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर सध्या २.०४ टक्क्यांवर पोहोचला असून कोरोनाबाधितांचा आकडा १६,३७,७३५ वर पोहोचला आहे. यामध्ये आज पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्यामुळे हा आकडा आज (शनिवारी) पुन्हा वाढणार आहे.