मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आता आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे. शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागण्याआधीच शिवसेना नेत्यांच्या गर्दीतून गायब झालेल्या एकनाथ शिंदे थेट सुरतला जाऊन पोहोचले. सकाळी समोर आलेल्या या माहितीने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, यामुळे सरकारच्या अस्थिरतेवर परिणाम होण्याची शक्यता दिसत आहे. गुजरातमधील सुरतमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे हे मुक्कामला असून, त्यांच्यासोबत जवळपास २० पेक्षा अधिक आमदार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या मंत्री, आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेसमोर नवं संकट उभं केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेलाच आव्हान दिल्यानं शिवसेनेकडून त्यांच्याबद्दल काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागलं होतं. शिवसेनेकडून पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह दोन नेते सुरतच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, त्यापूर्वीच शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. नगर विकास मंत्री असणारे एकनाथ शिंदे शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते होते. मात्र, शिवसेनेनं आता त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना बाजूला केल्यानंतर गटनेते पदाची जबाबदारी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्याकडे दिली आहे.