मुंबई (वृत्तसंस्था) उद्या महाविकास आघाडीचा नवा घोटाळा आपण उघडकीस आणणार, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कुंटुंबातील एका व्यक्तीचा घोटाळा उघड करणार असल्याचे सोमय्या म्हणाले. सोमय्या यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. तसेच, मी नॉट रिचेबल का झालो होतो? याचंही उत्तर देणार असल्याचं सोमय्या म्हणाले आहेत.
संजय राऊतांनी विक्रांत फाईल्स उघडल्यानंतर याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तेव्हापासून किरीट सोमय्या आणि नील सोमय्या नॉट रिचेबल होते. संजय राऊतांनीही वारंवार सोमय्या फरार असल्याचा दावा ट्विटरवरुन केला होता. अशातच मुंबई उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याच पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्यांनी उद्या नवा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
आणखी एक घोटाळा जनतेसमोर उघडकीस आणणार
भाजप खासदार किरीट सोमय्या म्हणाले की, “मुंबई महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रश्नच येत नाही. मुंबई केंद्रशासित होणार नाही, ही स्टंटबाजी करुन संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यावरुन घोटाळ्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. ” पुढे बोलताना उद्धव साहेब उद्या तुमच्या कुटुंबाचा आणखी एक घोटाळा जनतेसमोर उघडकीस आणणार आहे, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे. तसेच, घोटाळेबाजांकडील पैसा पुन्हा जनतेच्या तिजोरीत जमा करणं हा माझा धर्म आहे, कर्तव्य आहे, असंह ते म्हणाले.
राऊतांनी ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले
“ठाकरे सरकारमधील एक डझजन लोकांची प्रॉपर्टी अटॅच झाली आहे. अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिक, संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, अनंतराव अडसूळ आणि इतरांची संपत्ती अटॅच झाली आहे. नियमांप्रमाणे मी किंवा वकील जाऊ शकतात. आम्ही कोर्टात सगळी माहीती देत आहोत, 1997-98 पासून विक्रांतची मोहीम सुरू झाली. विक्रांतचा कार्यक्रम सिंबॉलिक होता. विक्रांत वाचवण्यासाठी सेनेनं समर्थन दिलं होतं. 1997 सालापासून सुरुवात केली आहे. संजय राऊतांनी ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटींग म्हणतात.”, असं किरीट सोमय्या म्हणाले.
यापूर्वी किरीट सोमय्यांनी केले होते अनेक दावे
किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीवर नेहमी टीका करत असतात, नुकतेच त्यांनी रश्मी ठाकरे यांचे अलिबाग येथील अनधिकृत बंगले असल्याचा दावा केला होता. तसेच संजय राऊत यांनी कोरोना काळात पुण्यातील कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार केला असा आरोप देखील सोमय्यांनी केला आहे.