मुंबई (वृत्तसंस्था) लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफ न करता त्याची सक्तीने वसूल करा, असं भाष्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केल्यानंतर विरोधी पक्ष नेते आक्रमक झाले आहेत. याच मुद्यांवरून आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर टोला लगावला आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे
‘वाढीव वीज बिलांबाबत सामान्यांना दिलासा मिळेल, असे राज्य सरकार सुरुवातीला सांगत होते. मात्र, आता उर्जामंत्र्यांनी यू-टर्न घेत लोकांना वीजेची बिले भरावीच लागतील, असे जाहीर केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे आता संजय राऊत यांना राज ठाकरे मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना का भेटायला गेले, हे कळाले असावे.’
तत्पूर्वी, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी वाढीव वीजदरांच्या प्रश्नावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीविषयी शिवसेना नेते संजय राऊत यांनी आक्षेप नोंदवला होता. राज्यपालांना कार्यकारी अधिकार नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही काही लोक राज्यपालांना भेटत असतात. मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली होती.