जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधील प्लास्टिक मोल्डेड फर्निचर बनविणाऱ्या स्वामी पॉलिटेक नावाच्या कंपनीतून २० लाख ६८ हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्याने आणखी दोन घरफोड्यांची कबुली दिली आहे. अरविंद अरूण वाघोदे (वय २२, रा. कोल्ही गोलाद, ता. मोताळा, जि. बुलढाणा, ह. मु. कृष्णानगर, सुप्रिम कॉलनी, जळगाव), असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
अरविंद वाघोदे याने स्वामी पॉलिटेक येथील चोरलेल्या १९ लाख ७८ हजार १०० रुपयांची रोकड व इतर ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. दरम्यान, पोलिसांनी वाघोदे याची अधिक चौकशी केली असता त्याने आणखी दोन गुन्ह्यांची कबुली दिली. यात ६ जूलै २०२० रोजी गोपाल दालमिल येथुन ५५ हजार रुपयांचाा मोबाईल व पाच हजार रुपये तसेच १५ जूलै २०२० रोजी भार्गव रिट्रेडींग कंपनीचा दरवाजा व कडी-कोयंड तोडून कंपनीतील ८० हजार रुपये रोख व एक हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याच्याकडून गोपाल दालमिल मधील ५५ हजार रुपयांचा मोबाईल व भार्गर रिट्रेडींग येथील ८० हजार रुपयांपैकी ३५ हजार रुपये हस्तगत केले आहेत. पुढील तपास पो. नि. विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, रतीलाल पवार, इम्रान सय्यद हे करीत आहेत.