लखनऊ । दोन आठवड्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधील हाथसर येथे २० वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली असून त्या पिडीतेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांकडून आक्रोश व्यक्त केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 14 सप्टेंबरला तिच्यावर चार ते पाच जणांनी बलात्कार केला होता. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात सदरील पिडीत मुलीवर उपचार सुरू होते. तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात मारहान करण्यात आली होती. त्यामुळे तिच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा तसेच फ्रॅक्चर्स झाल्याने सदरील पीडित मुलगी उपचारादरम्यान प्रतिसाद देत नव्हती. आज उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदरील पीडित मुलगी दलित कुटुंबातील होती.
सदरील पीडित मुलीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या आईसोबत शेतात जनावरांना चारा आणण्यासाठी गेली होती. त्यादरम्यान तीन-चार जण आले आणि त्या मुलीला उचलून लांब शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं मुलीच्या भावाने सांगितले आहे. दरम्यान, लखनऊमध्ये दलित समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर पीडित मुलीच्या भावाने आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर बसपा अध्यक्षा मायावती यांनी सुद्धा योगी सरकारवर सदरील घटनेविषयी टिका केली आहे. योगी सरकारने पीडितेच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.