जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाची कुंपन भिंत व बोरिंगचे काम व्यवस्थित केले जात नाही. ते काम सुरू ठेवण्यासाठी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याने मक्तेदाराकडून ४० हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहायक अभियंता विद्याधर गोंडू भालेराव यांच्याविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील नगरदेवळा येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाची कुंपन भिंत व बोरिंग करण्याचे नऊ लाख ६५ हजार ३७१ रुपयांच्या कामाचा सबकॉन्ट्रॅक्ट तक्रारदाराने घेतला आहे. हे काम सुरु असतसांना कामाच्या ठिकाणी महावितरणचे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) अनिरुद्ध नाईकवाडे यांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी मक्तेदाराला काम बरोबर होत नसून मुदतीत काम पूर्ण होत नसल्याने त्याला नोटीस बजावली होती. त्यानंतर मक्तेदाराने वेळोवेळी नाईकवाडे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी स्थापत्य अभियंता नाईकवाडे यांनी काम सुरळीत सुरू ठेवायचे असेल, तर त्यासाठी १० टक्के प्रमाणे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच पैसे दिले नाही तर केलेल्या कामात त्रूटी काढून कामबंद पाडुन पुढील काम मिळू देणार नाही, अशी धमकी देखील दिली होती. त्यामुळे मक्तेदाराने नाईलाजास्तव ६० हजार रुपये दिले. तर उर्वरित ४० हजारांची नाईकवाडे यांनी मागणी केली होती. परंतु मक्तेदाराला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दि. २ जून, दि. ६ जून व दि. १२ जून २०२३ रोजी पडताळणी केली. त्यानंतर तक्रारदाराला दि. १२ जून रोजी नाईकवाडे यांच्याशी बोलणे करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पाठविले. मात्र कार्यलायत हजर नसल्याने तक्रारदाराची सहायक अभियंता भालेराव यांच्याशी भेट झाली. त्यावेळी त्यांनी नाईकवाडे यांच्यासाठी २० हजार व स्वतःसाठी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रार देण्यास नकार दिलयानंतरही गुन्हा दाखल लाचेची मागणी झाल्यानंतर संबंधित तक्रारदाराने पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास नकार दिला. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांनी सरकार पक्षातर्फे फिर्यादी होऊन भालेराव यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भालेराव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव करीत आहेत.