लखनौ (वृत्तसंस्था) केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर थेट गाडी घातल्याचा आरोप आहे. या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहे. या घटनेनंतर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी हरगावमध्येच अटक केली असल्याचं युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी म्हटलं आहे.
युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बि. व्ही. यांनी, “प्रियंका गांधी वढेरा यांना हरगावमधून अटक करण्यात आलीय,” असा दावा आपल्या ट्विटमध्ये केलाय. “शेवटी तेच झालं ते भाजपाला अपेक्षित होतं. ‘महात्मा गांधीं’च्या लोकशाही देशामध्ये ‘गोडसे’ समर्थकांनी भर पावसामध्ये आणि पोलीस दलाच्या तुकड्यांना तोंड देत अन्नदाता शेतकऱ्याला भेटण्यासाठी पोहचलेल्या आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांना हरगावमध्ये अटक केली. ही केवळ लढाईची सुरुवात आहे. शेतकरी एकजुटीचा विजय असो,” असं श्रीनिवास यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
“आजच्या घटनेवरुन दिसून येत आहेत की हे सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी राजकारण करत आहे. हा शेतकऱ्यांचा देश आहे भाजपाचा नाही. पिडितांच्या नातेवाईकांना भेटून मी काही गुन्हा करत नाही. ते आम्हाला का अडवत आहेत? त्यांच्याकडे अटक करण्यासाठी वॉरंट तरी हवं ना?,” असे प्रश्न प्रियंका यांनी उपस्थित केले आहेत.
नेमकी घटना काय?
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि काही कार्यकर्ते दोन तीन गाड्यातून गेले. ज्या मार्गावर ते होते त्याच मार्गावर कृषी कायद्यांच्याविरोधात काही शेतकरी आंदोलन करत होते. भाजप कार्यकर्ते आणि आंदोलक यांच्या काही तरी बाचाबाची झाली आणि मग गृहराज्य मंत्र्यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावरच थेट गाडी घातल्याचा आरोप केला गेलाय.
केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचं मूळ गाव बनवीरपूर गावात ही घटना घडली. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी गावात येणार होते. त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी जमलेल्या शेतकरी आंदोलकांवर दोन मोटारी घुसवल्यानंतर हिंसाचार घडला. आंदोलकांनी या दोन मोटारींना आग लावल्याचाही आरोप करण्यात येत आहे. या घटनेत चार शेतकरी आणि इतर चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी एका मोटारीत आशिष मिश्रा हा मंत्रीपुत्र होता, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र मंत्रीमहोदयांनी हा आरोप फेटाळला आहे. या घटनेत भाजपच्या तीन कार्यकर्त्यांचा आणि एका वाहन चालकाचा मृत्यू झाला आहे, असं मिश्रा यांनी सांगितलं.