मुंबई प्रतिनिधी । अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड हादरलं आहे. या प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) सगळ्यांची कसून चौकशी करत आहे. या चौकशीत ड्रग्ज नेटवर्कचे अनेक मोठा धागेदोरे NCB हाती लागले आहेत. यातल्या मुख्य आरोपींनाही न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुशांतसिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या भायखळा कारागृहात आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात जामिनावर सुनावणी होणार आहे. आता या तिन्ही आरोपींना जामीन मिळतो की त्यांची जामीन याचिका फेटाळली जाते हे पाहावे लागेल.
रिया ड्रग्ज प्रकरणात सॅम्युअल मिरांडा, अब्दुल बासित परिहार, दिपेश सावंत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी या तिघांची जामीन याचिका मुंबईच्या सत्र न्यायालयाने फेटाळली होती. या प्रकरणात मिरांडा, बासित आणि दिपेशची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगण्यात येतं. सॅम्युअल मिरांडा सुशांतचा घर मॅनेजर आहे. जेव्हा चौकशीत रिया आणि शोविकचे मोबाईल चॅट्स समोर आले तेव्हा सॅम्युअल मिरांडा हा ड्रग्ज सप्लाय करायचा अशी माहिती समोर आली होती. अब्दुल बासित परिहार हा ड्रग पेडलर आहे. इतकंच नाही तर बासित फक्त रिया आणि शोविकच्या सांगण्यावरून ड्रग्जचा जुगाड करायचा. दिपेश सावंत सुशांतसिंग राजपूतचा नोकर आहे. ड्रग्ज प्रकरणातही त्याचाही हात असल्याचं समोर आलं आहे.